हिंदजागर न्यूज, प्रतिनिधी, पुणे – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्यावर मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही, असं म्हणत टीका केली आहे. रोहित पवार यांनी यासंदर्भात एक्सवर पोस्ट केली आहे.
काय म्हणाले रोहित पवार ?
“पुण्यातील मॉडर्न महाविद्यालयाने वेळेत कागदपत्रांची पडताळणी करून दिली नाही म्हणून एका युवा विद्यार्थ्याची लंडनमधील नोकरी जात असेल तर हे योग्य नाही. ज्या मानसिकतेतून मा. सरन्यायाधीश साहेबांवर बूट फेकण्याचा प्रयत्न झाला त्याच मानसिकतेतून प्रेम बिऱ्हाडे या युवकाला छळन्याचा प्रयत्न मॉडर्न कॉलेज प्रशासन करत आहे का?”
“महाविद्यालयाचा स्टाफ सहकार्य करणारा आहे यात कुठली शंका नाही, पण सर्व नियम कायदे, ज्येष्ठताक्रम डावलून प्राचार्य झालेल्या नव्या प्राचार्या मॅडम मनुवादी विचारांच्या आहेत यात देखील कुणाचं दुमत नाही. चांगला नावलौकिक आणि मोठा वारसा असलेल्या महाविद्यालयात असले मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही.”
“महाविद्यालयाने त्या युवा विद्यार्थ्याला आवश्यक सहकार्य करून दिलगिरी व्यक्त करावी तसेच भविष्यात अशा चुका होणार नाहीत याची काळजी घ्यावी आणि हे मनुवादी राजकारण थांबवावे अन्यथा कॉलेज प्रशासनाला हे परवडणार नाही.”
— गणेश मारुती जोशी ( स्थानिक प्रतिनिधी )














