हिंदजागर न्युज, पुणे- प्रतिनिधी – पुणे शहराला येथील खाद्यपदार्थांमुळे एक खास ओळख मिळाली आहे. या शहरात असे अनेक जुने आणि प्रसिद्ध फूड आऊटलेट्स आहेत, जे वर्षानुवर्षे आपल्या पदार्थांची पारंपरिक चव टिकवून आहेत. मात्र, आता पुण्यातील याच खाद्यसंस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग असलेल्या प्रसिद्ध गुडलक कॅफेबद्दल काही दिवसांपूर्वी एक धक्कादायक बातमी समोर आली.या कॅफेच्या जगप्रसिद्ध बनमस्क्यामध्ये चक्क काचेचा तुकडा सापडला. ज्यामुळे खवय्यांमध्ये मोठी खळबळ उडाली.
दरम्यान, या प्रकरणात आता अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) एक मोठा निर्णय घेत गुडलक कॅफेला धक्का दिला आहे. गुडलक कॅफेचा परवाना तात्पुरता निलंबित करण्यात आला असून, तपासणीत आढळलेल्या त्रुटी दूर होईपर्यंत परवाना निलंबित राहणार असल्याचं सांगितलं आहे.
बन मस्क्यात काचेचे आढळल्यामुळे ‘गुडलक कॅफे’चा परवाना तात्पुरत्या स्वरूपात निलंबित केला जात आहे. तर पुढील तपासासाठी नमुने घेण्यात आले आहेत. त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल, असं सह आयुक्त, अन्न व औषध प्रशासन सुरेश अन्नपुरे यांनी म्हटलं आहे.
काही दिवसांपूर्वी एक दाम्पत्य याठकाणी चहा आणि बन मस्क्याचा आनंद घेण्यासाठी आले होते. मात्र, त्यांना त्यांच्या बन मस्क्यात काचेचे तुकडे आढळले. त्यांनी याचा एक व्हिडिओ कढत तो सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाकडे (एफडीए) याबाबत तक्रार दाखल करण्यात आली. त्यानुसार आता त्यांचा परवाना तात्पुरता निलंबित करण्यात आला आहे.
स्थानिक प्रतिनिधी- पी.एस.सूर्यवंशी














