HINDJAGAR- NEWS – Mumbai – सरपंच संतोष देशमुख प्रकरणामुळे अवघा महाराष्ट्र ढवळून निघाला. बीडमध्ये घडलेल्या या घटनेमुळे राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर थेट आरोप झाले. त्यामुळे धनंजय मुंडेंना बीडचे पालकमंत्री करू नका, अशी मागणी झाली.भाजपचे आमदार सुरेश धस यांनी उघडपणे यासाठी विरोध केला होता. तर विरोधकांनीही मुद्दा लावून धरला होता. अखेरीस धनंजय मुंडे यांना पालकमंत्रिपदावरून पाणी फेरावं लागलं आहे. तर पंकजा मुंडे यांना मात्र जालना जिल्ह्याचं पालकमंत्रिपद मिळालं आहे. विशेष म्हणजे, पहिल्यांदाच मुंडे घराण्यातील व्यक्तीला बीडच्या बाहेर पालकमंत्रिपद मिळालं आहे.
राज्यात फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार बऱ्या उशिराने झाला. त्यानंतर पालकमंत्री कोण होणार, यासाठीही उशीर झाला. त्यातच बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. त्यामुळे बीडच्या पालकमंत्रिपदामुळे यादी पुन्हा रखडली, असल्याची चर्चा रंगली. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर तोडगा काढला आहे. बीडमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. बीडचे पालकमंत्रिपद थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यात आलं आहे. अजित दादांकडे बीडसह पुण्याचंही पालकमंत्रिपद देण्यात आलं आहे. तर पंकजा मुंडे यांच्याकडे कोणती जबाबदारी देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. पंकजा मुंडे यांच्याकडे जालना जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी सोपवली आहे.
तब्बल दुसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गडचिरोलीच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी मिळाली आहे. उपमुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःहून गडचिरोली जिल्ह्याचा पालकमंत्री पद स्वीकारलं होतं. यावेळी देवेंद्र फडणवीस स्वतः मुख्यमंत्री झाल्याने गडचिरोली जिल्ह्याचा पालकमंत्री पदाबाबत ते काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष होतं.. मात्र मुख्यमंत्री झाल्यानंतर ही देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीच्या विकासाच्या दृष्टीने मोठा निर्णय घेऊन पालकमंत्री पद स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.. एखाद्या जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वीकारणारे देवेंद्र फडणवीस राज्याचे पहिले मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी गेल्याने गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाला पुढील नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
News Repoted By – P. S. SURYANSHI..














